पॅरालिम्पिकमध्ये अवनीचे सुवर्णपदक

भारताच्या खात्यात एकाच दिवशी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पॅरिस : पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखरा हिने एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे.
अवनीने २४९.७ एवढे गुण १० मी. एअर रायफल प्रकारात मिळवले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. यावेळी अवनीच्या आसपासही कोणता स्पर्धक नव्हता. त्यामुळे अवनी पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकेल, असे सर्वांना वाटले होते. अवनीने ही आघाडी कायम ठेवली आणि भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. पण पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून देण्याची तिची ही भारतासाठी पहिलीच वेळ नाही.
अवनी लेखरा हिने यापूर्वी टोकिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतही सहभागी झाली होती. त्यावेळी अवनी कशी कामगिरी करेल, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. अवनीने त्यावेळी नेत्रदीपक कामगिरी केली होती. अवनीने त्यावेळी गोल्ड मेडल मिळवलं होतं. अवनीचं ते पहिलं गोल्ड मेडल होतं. त्यानंतर आता अवनीने दुसरं गोल्ड मेडल पॅरिसमध्ये मिळवलं आहे. आतापर्यंत भारताला कोणत्याही खेळाडूने दोन गोल्ड मेडल्स मिळवून दिलेली नाही. अवनी ही पहिलीच अशी भारताची खेळाडू ठरली आहे की, तिने भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये दोन गोल्ड मेडल्स मिळवलेली आहेत. त्यामुळे अवनीची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच आहे.
याच स्पर्धेत मोना अगरवालने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले होते. आता भारताच्या प्रीती पालने पुन्हा एकदा भारताला पदक जिंकवून दिले आहे. प्रीतीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक कमावले आहे. प्रीतीने यावेळी आपल्याच रेकॉर्ड यावेळी मोडला. प्रीतीने १०० मीटरचे अंतर १४.२१ सेकंदांत पूर्ण केले आणि भारताला कांस्यपदक जिंकवून दिले.