पक्षात घ्या.. पण अटी नकोत!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : अमूक एक पद मिळालं पाहिजे.. मला नाही किमान माझ्या घरात तरी तिकीट द्या.. या किंवा यापेक्षाही भन्नाट अटी घालून या पक्षातून त्या पक्षात ये-जा करणाऱ्यांची संख्या राजकारणात वाढते आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता घरवापसी करू पाहणाऱ्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही अटी शिवाय पक्षात येण्याचे बंधन घातले गेले आहे. सध्या पिंपरी-चिंचवडमधल्या राजकीय वर्तुळात हाच ट्रेंड सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना सुरवात झाली आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील १७ ते १८ नगरसेवकांनी पुन्हा घरवापसीचे संकेत दिले आहेत. त्यांना आता पुन्हा अजित पवार गटात परतण्याचे वेध लागले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. त्यांच्यासारखा नेताच आगामी पालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे गुणगान गायले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभेची निवडणूक लढवून पराभूत झालेले अजित गव्हाणे आणि त्यांचे सहकारी पुन्हा तुतारी
ची साथ सोडून घड्याळाकडे
आकर्षित होऊ लागले आहेत.
२०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी सर्वाधिक ७७ जागा भाजपने जिंकल्या. एकहाती सत्ता मिळविली. त्या पाठोपाठ ३६ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या प्रमुख दोन्ही पक्षांचे संख्याबळ १२८ पैकी ११३ होते. आता आगामी निवडणूकही याच दोन्ही पक्षात लढली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ३५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी या पक्षाने मोट बांधण्यास आत्तापासूनच सुरवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घरवापसी करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना प्रमुख पक्षांनी विनाअटचे पक्षात येण्याचे बंधन घातले आहे. स्वहितापेक्षा पक्षहित लक्षात घ्या, अशी सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये ऐनवेळी प्रवेश करून महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यात आले. अर्थात, त्यामध्ये कोणालाही यश आले नाही. मात्र, पालिकेच्या आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात महायुती पण महापालिका निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढती, असे चित्र दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय प्रमुख पक्षाच्या श्रेष्ठींनी स्थानिक पातळीवरील भूमिकेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे.
एकनाथ पवारांनी शिवबंधन तोडले
विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करीत शिवबंधन बांधले. राज्य संघटक पद मिळविले. त्यानंतर लोहा-कंधार मतदारसंघातून या पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणूक लढविली आणि पराभूतही झाले. आता वैयक्तिक कारणास्तव शिवसेनेच्या उबाठा गटातील सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे सोमवारी (२० जानेवारी) जाहीर केले आहे. मात्र, भविष्यातील भूमिका जाहीर केलेली नाही.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, भोसरी विधानसभा मतदारसंघातून सुमारे दिड लाख मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिली आहे. त्यांचा विश्वास तोडून कोणी पक्ष सोडून जात असेल तर त्यांचा त्यांना लखलाभ असावा. त्या वेळी पक्षातील इच्छुकांना डावलून शिवसेनेकडून उमेदवारी खेचून अजित गव्हाणेंना साथ दिली आहे. त्यामुळे ते विश्वासघात करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तरीही ते गेले तर आम्हाला फरक पडणार नाही.
तर, दुसरीकडे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, पक्षाच्या भोसरीतील माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली आहे. पालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून कोणी पक्षप्रवेश किंवा घरवापसी करीत असेल तर त्यांचे स्वागतच केले जाईल. मात्र, हे स्वागत करताना पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांची भूमिकादेखील पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देणार आहोत. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय अंतिम असणार आहे.