ज्वेलर्सचे दुकानातील दरोडाप्रकरणी; परप्रांतीय टोळी गजाआड!

तीस लाख वीस हजार रुपये किंमतीचा माल जप्त ; आरोपींना दुकानातील कामगाराने दिली माहिती
चाकण : चाकण बाजारपेठेतील एका ज्वेलर्सचे दुकान फोडून परराज्यातील टोळीने दुकानातून 77 लाख 22 हजार रुपये किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली होती. पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुजरात राज्यापर्यंत मागोवा घेत आरोपींना ताब्यात घेतले. तीस लाख वीस हजार रुपये किंमतीचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुल्हे डॅा. शिवाजी पवार यांनी दिली.

पोलीसांनी दिलेल्या साहितीनुसार, ज्वेलर्सचे दुकान 22 एप्रिल रोजी फोडण्यात आले. त्यानंतर फिर्यादी भरत समीरमल वंजारा (वय 35, रा विशाल पार्क, चाकण बाजारपेठ) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दाखल केली होती. हा तपास गुन्हे शाखा युनिट तीन मार्फत करण्यात आला. नेहमीप्रमाणे रात्री फिर्यादी यांनी आपले दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात आल्यावर त्यांना दुकान फोडल्याचे दिसून आले. दुकानातील 77 लाख 22 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी नाशिक महामार्गावरून गुजरात राज्यात गेल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास करून गुजरात मध्ये आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हिम्मत कुमार रोशन जी साळवी (वय 37, रा. गुजरात), मुकेश उर्फ अजय भैरू लाल साळवी (वय 24, रा. राजस्थान), राधेश्याम भैरू लाल साळवी (वय 22, राजस्थान), पुखराज ओम प्रकाश लौहार (वय 21, रा. राजस्थान) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी आणखी दोन मित्र सुमित राजूभाई बंगाली आणि कालू या सर्वांनी कारमधून चाकण गाठत येथील ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील ऐवज लंपास केल्याचे सांगितले.
आरोपींना दुकानातील कामगार किशन रामलाल सोनी (वय 22, रा. चाकण, मूळ- राजस्थान) याने माहिती देऊन चाकण मध्ये बोलावून घेतले असे पोलिसांनी सांगितले .कामगाराने चावी आरोपींना दिली. त्यानुसार आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने आतील शटर तोडून दुकानात प्रवेश करीत चोरी केली. त्यातील काही मुद्देमाल राजू तर काही मुद्देमाल सुमित बंगाली व कालूस दिला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार दागिने असे एकूण 30 लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी व युनिटकडील पथक करीत आहे.
गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, संदीप सोनवणे, श्रीधन इचके, मनोज साबळे, सचिन गोनटे, बाळासाहेब मांगले, सुधीर दांगट, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, सुंदर थोरात, समीर काळे, निखिल फापाळे, राजकुमारी इगारे यांनी तपास पथकात ही कामगिरी केली.

