पिंपरीत गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : अवघ्या पाच दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन येऊन ठेपलेले असताना पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वत्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गणेश उत्सव मंडळांमध्ये विविध विषयांवरील देखाव्यांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये आता नागरिकांची लगबग सुरू आहे. घरगुती गणपतीसाठी साहित्याची खरेदी, नैवेद्यासाठी शिधा आणि धान्याची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कार्यकर्ते दिवसरात्र राबून मंडपाची आणि देखाव्यांची तयारी पूर्ण करत आहेत. इकोफ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सगळ्याच मंडळांचा कल असावा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अशा मूर्ती वापरून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळे प्राधान्य देतील अशी शक्यता आहे.
बाजारपेठांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर चायनिज दिव्यांच्या माळा, प्लॅस्टिकची फुले, प्लॅस्टिकची तोरणे यांची विक्री सुरू आहे. सजावटीतील वैविध्य आणि कमी खर्चात होणारी खरेदी म्हणून ग्राहक देखील या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात. मात्र, काही लोक आवर्जून पर्यावरणपूरक सजावटीवर भर देत आहेत. थर्माकोलचा वापर तुलनेने कमी होताना दिसतो आहे.
काय असेल यंदाच्या उत्सवात?
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात देखाव्यांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय, सामाजिक विषयांवर आवर्जून देखावे तयार केले जात आहेत. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता महिलांची सुरक्षितता आणि महिला अत्याचारांना विरोध हा विषय सुद्धा अनेक मंडळांनी हाती घेतला आहे. जिवंत देखाव्यांमधून हा विषय आवर्जून मांडण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर किंवा त्याची प्रतिकृती असे विषय सुद्धा काही मंडळे हाताळत आहेत. चांद्रयान मोहिमेतील भारताची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता, तो विषय सुद्धा यंदाच्या उत्सवाचे आकर्षण असेल. याखेरीज पौराणिक, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक देखावे, किंवा वैज्ञानिक विषय हाताळले जात आहेत.