चिंचवडमध्ये नाना काटे अपक्ष लढणार

आज उमेदवारी अर्ज भरणार
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरणार आहेत. नाना काटे आज सोमवार (दि.२८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या नाना काटे यांनी बंडखोरी करत निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पिंपळे सौदागर येथे त्यांच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांची संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, सागर कोकणे, शाम जगताप यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील जवळपास सर्वच नगरसेवक आपल्याबरोबर असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
नाना काटे उद्या त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे. आता नाना काटे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.