बेकायदा विदेशी दारूची वाहतूक; एकाला अटक!

पिंपरी: विदेशी दारूची दुचाकी वरून बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका डिलिव्हरी बाॅयला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 74 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ही घटना बुधवार 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकड येथील रोलेक्स रोडवर घडली.
याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानदेव झेंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजित सोमेश्वर कुदळे (वय 30, रा. राहटणी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून माल देणाऱ्या प्रथम वाईन शॉपच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुजित हा त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून विनापरवाना विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याच्याकडे दारू खरेदी किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता पोलिसांनी त्याच्याकडून 74 हजार रुपये किमतीचा प्रोव्हिबिशनचा माल आणि दुचाकी जप्त केली आहे.

दत्तनगर भागात कोयता फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला अटक!
पिंपरी : दत्तनगर भागात हातात कोयता घेऊन हवेत मिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवार 30 डिसेंबर रोजी रात्री कुंभार चाळ, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी शौर्य शिवाजी आडागळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष बापूराव पवार (रा. दत्तनगर चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्या एका अनोळखी साथीदारावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला विनाकारण शिवीगाळ केली. आरोपी संतोष याने हातात लोखंडी कोयता घेऊन तो हवेत फिरवत परिसरातील लोकांना धमकावीत होता. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

