फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
पिंपरी-चिंचवड

बांधकाम व औद्योगिक आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई!

बांधकाम व औद्योगिक आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई!


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महापालिकेतील विविध विभागांनी समन्वयाने काम करून प्रदूषण नियंत्रणाची गती वाढवावी तसेच प्रदूषणाशी संबंधित नियमावलीची व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी दिले.

viara vcc
viara vcc

महापालिका मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता सोहन निकम, योगेश आल्हाट, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता पंकज धेंडे, प्रीती गाडे, अशोक मोरे, संजय चव्हाण तसेच पर्यावरण विभाग, स्थापत्य विभाग, बांधकाम परवाना विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत उपद्रव शोध पथकातील मनुष्यबळात वाढ करून शहरातील प्रत्येक बांधकाम प्रकल्प, रेडी मिक्स काँक्रिट प्लांट आणि औद्योगिक परिसरांना अधिकाधिक भेट द्यावी, असे निर्देश देण्यात आले. संबंधित ठिकाणी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (ग्रॅप) मधील नियमांचे पालन होते का, याची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई तसेच कठोर प्रशासकीय उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील बांधकाम स्थळांवरून उडणारी धूळ आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधकाम प्रकल्प आणि आरएमसी प्लांटवर एक्यूआय मॉनिटरिंग सिस्टीम बसविणे अनिवार्य आहे त्यानुसार त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून त्या परिसरातील प्रत्यक्ष वायू गुणवत्ता सतत मोजण्यास मदत होईल आणि नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यातर्फे महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदूषण नियंत्रणाशी निगडित नियम, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणी प्रक्रियेबाबत विशेषतः संवेदनशील करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व औद्योगिक आस्थापनांनी ग्रॅप अंतर्गत सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करणे अत्यावश्यक आहे. धूळ नियंत्रण, उत्सर्जन व्यवस्थापन आणि स्वच्छतेसंदर्भातील कोणतीही ढिलाई स्वीकारली जाणार नाही. महापालिका प्रदूषण नियंत्रणाबाबत कठोर भूमिका घेत असून नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. सर्व विभागांनी समन्वयाने व जलद गतीने कार्य करून शहराच्या वायू गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा घडवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. – तृप्ती सांडभोर, अतिरिक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"