फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर अखेर हातोडा!

कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर अखेर हातोडा!

मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी येथे अखेर अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला आहे. महापालिकेने सहा दिवसांची मुदत देत अतिक्रमणे काढायला सांगितले होते. ती मुदत शुक्रवारी (दि.७) संपली होती. त्यामुळे शनिवारी (दि.८) पहाटेच महापालिकेने कारवाईस सुरवात केली आहे.

चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच या परिसरातील अनधिकृत बांधकामे अशा एकूण २२२ बांधकामावर आज महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि विविध क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूट बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबविली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशासनाला सूचना देखील केल्या. या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही निष्कासन कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुमारे ४२ एकर क्षेत्रात झालेल्या या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते.

या कारवाईसाठी महापालिकेची पथकं पहाटेचं तैनात करण्यात आली. पोलिसांकडून कारवाईस्थळी जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिवस उजेडताच कारवाईचा बडगा उगरण्यात आला. परिसरातील नागरिकांना काही काळण्यापूर्वी हातोडा पडल्यानं गेल्या आठवड्याप्रमाणे तणाव टळला. भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी दुकानदार या व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवरील कारवाईला पहाटेपासूनच सुरवात केली आहे.

कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ५ हजार अनधिकृत आस्थापनांना महापालिकेच्या ‘क’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. कारवाईला घेऊन स्थानिकांमध्ये नाराजीचा सुर मात्र कायम आहे. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"