एचए कर्मचाऱ्यांचे थकीत येणे व प्रलंबित पगारवाढीसंदर्भात चर्चा करणार!

एचए कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पिंपरी: हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही पुणे जिल्ह्यातील सत्तर वर्षे जुनी प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एचए कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी प्रयत्न करणार आहे. रसायन व खते मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन औषध निर्मिती संबंधीच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कर्मचाऱ्यांची थकीत बाकी व प्रलंबित पगारवाढ याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.
एचए कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुलकर्णी यांनी कंपनीस भेट दिली. प्रारंभी कॉलनीमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कंपनीच्या महिला सहकारी यांनी प्रवेशद्वारावरच खासदारांना तिळगुळ दिले. त्यानंतर खासदारांनी कंपनीस भेट दिली. या दरम्यान व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ, कार्मिक विभागाच्या प्रमुख सुनिता शिवतारे व भारतीय मजदूर संघाचे बाळासाहेब भुजबळ, सरचिटणीस विजय पाटील, बाळासाहेब जाधव, धनंजय देशमुख अन्य प्रमुखांची बैठक घेऊन कंपनी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी कंपनीच्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. कामगारांची प्रलंबित २००७ ची वेतनवाढ, थकीत देणे मिळवण्यासाठी व्यवस्थापन व संघटना एकत्रितपणे खात्याकडे पाठपुरावा करीत आहेत, असे सांगण्यात आले.
खासदार कुलकर्णी यांनी कामगारांशी संवाद साधून चर्चा केली. कार्यक्रमास अनिल ढुमणे, गोपीनाथ शेळके, राजेंद्र जाधव, पंडितराव पवार, उमेश कुलकर्णी, अनिल चांदणे, रवींद्र चव्हाण, सुजाता तांबे, कैलास शिंदे, शिवप्रसाद करमकर, विनायक बोरखडे, दीपक कदम, दिलीप खेडेकर, राजेंद्र सावंत, अनिल गाडे उपस्थित होते. यावेळी डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘रसायन व खते मंत्रालय केंद्रीय मंत्री जगत् प्रसाद नड्डा यांची भेट घेऊन औषध निर्मिती संबंधीच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम व प्रलंबित वेतनवाढ याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
संजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.