चऱ्होलीतील वन विभागाच्या रस्त्यासाठी ‘‘ग्रीन सिग्नल’’

स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई
पिंपरी : वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याला सीमाभिंत घालण्याचे काम सुरू केल्यामुळे चऱ्होली येथील खंडोबा माळ परिसरातील नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अखेर सीमाभिंती तयार करता रस्ता ठेवण्याबाबत वन विभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
चऱ्होली बु, खंडोबा माळ, सर्वे नंबर 98/4, सनसिटी व सेव्हनहिल या लोहगाव हद्दीतील वनविभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी वन विभागाकडून सीमा भिंतीचे काम चालू करण्यात आले होते. त्यामुळे खंडोबा माळ परिसरातील रहिवाशांना लोहगावकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता बंद होणार होता. ही बाब स्थानिक नागरिकांनी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने वन विभाग, महापालिका आणि नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेण्यात आली. यामध्ये डूडूळगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरला अत्यावश्यक मूलभूत सुविधा पुरविणे हे दोन्ही प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांच्या समवेत,अप्पर प्रधान मुख्यवनरक्षक, (केंद्रीय अधिकारी) नरेश झुरमुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, नगररचना विभागाचे संचालक प्रसाद गायकवाड,संदेश खडतरे, स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता श्री.वाडकर आदी उपस्थित होते.

वन विभागाच्या हद्दीत मात्र ग्रामपंचायत काळापासून वसलेल्या डुडुळगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये महापालिका प्रशासनाला पायाभूत सोयी-सुविधा देता येत नाही. याबाबत नुकतेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली होती. त्यानंतर वन विभागाने सीमाभिंतीचे काम सुरू केल्यामुळे चऱ्होली बु. खंडोबा माळ येथील रस्ता बंद होत होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या हद्दीत होणारे ‘इको टुरिझम पार्क’ प्रकल्पासाठीही आम्ही पाठपुरावा करीत आहोत. महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा