पाषाण उपकेंद्र ते औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत वीजवाहिनी साठी निधी द्यावा : आमदार शंकर जगताप

‘डीपीडीसी”च्या बैठकीत आमदार जगताप यांची मागणी
पिंपरी : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आग्रही भूमिका घेत त्यांनी एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत उच्च क्षमतेची (२२ के.व्ही.३०० स्क्वेअर मिमी) नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये चिंचवड मतदार संघातील अनियमित वीजपुरवठ्यावरून आमदार शंकर जगताप यांनी आग्रही भूमिका घेतली. या बैठकीत बोलताना आमदार जगताप म्हणाले, चिंचवड मतदार संघातील जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी अखंडीत विद्युत प्रवाह होत असल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी व्होल्टेज चढ-उतार आणि केबल बिघाडाच्या घटना घडत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत (सुमारे २.५ किमी) २२ के.व्ही., ३०० स्क्वेअर मिमी क्षमतेची नवीन उच्च दर्जाची व सुरक्षित वीज वाहिनी टाकण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. सद्यस्थितीत असलेली मुख्य केबल जुनी व तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाली असून अनेक ठिकाणी जॉइंट्स असल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

