कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक!

पिंपरी : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तब्बल एक कोटी ८६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे घडली आहे. शनिवारी (दि १) गुन्हा दाखल झाला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय कृष्णा वाडकर (पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. परवेज मकबुल इनामदार-मुलाणी (वय ३३, रा. एवलॉन सिटी, दापोडी, पुणे) यांनी शनिवारी (१ नोव्हेंबर) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ४ मे २०२३ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे घडली.
फिर्यादी व त्यांच्या भावाकडून मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे असलेल्या १ हेक्टर ३६ आर क्षेत्रापैकी ४० आर इतकी जमीन विक्रीस देण्याचे सांगून एक कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र त्याबदल्यात खरेदीखत न करता वाडकरने तीच जमीन इतरांना विकली. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या भावाची फसवणूक झाली.

चाकणमध्ये गांजासह एकास अटक!
पिंपरी : पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीकडून ४०२ ग्रॅम गांजा व मोबाइल असा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण येथील नाणेकरवाडी परिसरात शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णासाहेब तूकाराम नरूटे (वय ४०, रा. वडवे कॉम्प्लेक्स, नाणेकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिस हवालदार भैरोबा मनोहर यादव यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरुटेकडून टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीत लपविलेला२० हजार १०० रुपयांचा ४०२ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच मोबाइल व मोटारसायकल असा एकूण सुमारे ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

