रवी लांडगेंच्या हाती मशाल

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार रवी लांडगे यांनी अखेर त्यांच्या समर्थकांसह आज (मंगळवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागतही केले.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन रवी लांडगे यांनी पक्षप्रवेश केला आहे. तत्पूर्वी रवी लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड शहरातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तब्बल ५०० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाला होता. भोसरी पासून पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गापर्यंत रवी लांडगे यांच्या पक्ष प्रवेशाचा जोरदार प्रचार करण्यात आला आहे. पक्ष प्रवेशावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, सचिन आहिर, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
रवी लांडगे यांना जनसंघाची पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संघात सक्रिय सहभाग घेतला होता. त्या आधारेच भाजपामध्ये सक्रीय कार्य करण्यास कायम प्राधान्य दिले गेले होते. मात्र, पक्षातील काही अंतर्गत बदलांमुळे किंवा राजकारणामुळे सामाजिक कार्याचा केंद्रबिंदु बदलत राहिला. भोसरीत मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही रवी लांडगे यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर, धाक, दमदाटी या आधारावरच कामे केली जात आहेत आणि या सगळ्याला जनता कंटाळली असून, त्यांना बदलाची अपेक्षा आहे. भोसरीत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पक्षावर निष्ठा असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभेत निश्चित बदल घडवून आणला जाईल, असा विश्वासही रवी लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.