डुडूळगावमधील ‘इको टुरिझम पार्क’ला वन मंत्र्यांचा ‘बुस्टर’!

भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरवा
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मौजे डुडूळगाव येथे प्रस्तावित ‘‘इको टुरिझम पार्क’’साठी आवश्यक त्याची निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. तसेच, महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला चालना देणारा हा प्रकल्प विकसित करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.
वन विभागाशी संबंधित विविध मुद्यांवर बैठक नियोजित करावी, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, मंत्रालय येथे वनमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी वडगावशेरीचे आमदार बापुसाहेब पठारे, संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड टिंबर मर्चट्स अँड मॅन्युफैक्चरर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीत दि.21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या निर्णयाप्रमाणे लाकूड उपलब्धता अहवाल प्राप्त करुन असोसिएशनच्या सभासदनांना आरा गिरण्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना वनमंत्र्यांनी दिली.
तसेच, मौजे डुडुळगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे शेकडो वर्षांपासून स्थानिक नागरिकांचे वास्तव्य आहे. सदर जागा वन विभागाच्या हद्दीत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पायाभूत सोयी-सुविधा देता येत नाहीत. सबब, आण्णाभाऊ साठे नगरमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची परवानगी वन विभागाने महानगरपालिका प्रशासनाला द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. यावर महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार, वन विभागाच्या हद्दीत वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या पायाभूत सोयी-सुविधा देण्यास ना हरकत दाखला द्यावा, असेही निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले आहेत.

रस्त्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार
आमदार महेश लांडगे म्हणाले की, मौजे डुडूळगावमधील अण्णाभाऊ साठेनगर ग्रामपंचायतपासून वनविभागाच्या जागेत आहे. या भागातील नागरीकरांना स्वत:च्या घराची नोंदणी करता येत नाही. तसेच, या भागात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करता येत नाही. वन विभागाची हद्द लागून असल्यामुळे येथील 18 मीटर रोडच्या बाजुला परिसराचा विकास करता येत नाही. आता वनमंत्र्या दिलेल्या आश्वासनामुळे या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गाव डुडूळगावमध्ये पर्यटन व स्थानिक नागरिकांना सुविधा अशा संकल्पनेतून दुर्गा टेकडी, निगडीच्या धर्तीवर ‘‘इको टुरिझम पार्क’’ विकसित करता येईल, अशी भौगोलिक रचना आहे. या पार्कसाठी महानगरपालिका प्रशासनाने सल्लागार नियुक्त करावा. सदर कामासाठी वन विभागाने विविध योजनांमधून निधी उपलब्ध करुन कामाचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. तसेच, वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लाणार आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा