बांधकामे पाडू नका; अन्यथा..

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळी नदीच्या पात्रालगत, पुररेषेच्या जागेतच 2500 बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. पूररेषेतील घरे पाडली तर 8 लाख मतदार पिंपरी-चिंचवडच्या तिन्ही आमदारांना पाडतील असा इशारा पूररेषा रहिवासी संरक्षण समितीने दिला आहे.
अतिवृष्टी आणि धरणातून सोडणा-या विसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे महापालिकेने पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण केले. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नद्यांच्या पात्रालगत असलेल्या आणि निळ्या पुररेषेतील बांधकामांचे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानूसार शहरात नद्याच्या पात्रालगत व पुररेषेत निवासी, व्यावसायिक असे एकूण 2517 बांधकामे आढळून आली आहेत. यामध्ये निवासी 1308 आणि व्यावसायिक 1182, इतर 27 अशी बांधकामे आहेत. त्या सर्व बांधकामाना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान सांगवी भागातील नागरिकांना कारवाईला विरोध केला आहे. सांगवीतील घरे पाडली तर आठ लाख मतदार तिन्ही आमदारांना निवडणुकीत पाडण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. याबाबत फलक लावून सांगवी भागात जनजागृती केली जात आहे.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले की, क्षेत्रीय कार्यालयाकडून नदी पात्रालगत व पुररेषेतील निवासी व व्यावसायिक बांधकामाचा सर्वेक्षण सुरु आहे. आतापर्यंत 2500 अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यानुसार सर्वांना नोटीस देण्यात येत आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन कारवाईवर ठाम आहे.