शहरातील पदपथावरील मोटार गाड्यांवर प्रथम कारवाई : प्रभारी आयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांना त्रास दिला जाऊ नये. प्रथम पदपथावर उभी केलेली वाहने, मोटारी महापालिकेने अगोदर उचलाव्यात त्यानंतर पदपथावरील फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करावी. अतिक्रमण कारवाई करताना दुजाभाव होता कामा नये अशा सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना केली.

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार शुक्रवारी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना विविध कामांबाबत सूचना दिल्या. अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खराटे, तृप्ती सांडभोर ,सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यावेळी उपस्थित होते. सद्यस्थितीत शहरात कोणताही नवीन प्रकल्प आणू नये केवळ तातडीचे प्रस्ताव आणावेत, नियमितपणे स्वच्छता करावी, कचरा कोठे होता कामा नये ,रस्ते पदपथावर कचरा टाकू नये, जिथे कचरा दिसेल तेथील जबाबदार अधिकाऱ्याचे नाव मला सांगावे, पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देऊ नका, पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशा सूचना हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा ,वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रात सतत प्रगती साधली जात आहे. पिंपरी चिंचवड शहर हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. नागरिक महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवत नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले.

