“वॉकेथॉन फॉर मतदान” या उपक्रम सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांचा सहभाग!

पिंपरी : पहाटेच्या गुलाबी थंडीत हळूच पूर्वेकडून येणारी आशेची कोवळी किरणे….. सकाळी टेकडीवर फेरफटका मारायला आलेले आबालवृद्ध….. अचानक टेकडीच्या रस्त्यावर वाढलेली गर्दी….. हातात संदेश फलक घेऊन पुढे येणारी वर्दळ…. वर्दळीत सेल्फी घेण्यासाठी घाई करणारी तरुणाई ….. कवायती सोडून गर्दीच्या दिशेने कुतूहलाने पाहणारे नागरिक ….. गर्दी जवळ येताच सुखद धक्क्याने चकित होऊन गर्दीत सहभागी होणारे महिला-पुरुष….. असे दुर्मिळ चित्र निर्माण झाले, ते दुर्गादेवी टेकडी येथे महापालिकेने आयोजित केलेल्या “वॉकेथॉन फॉर मतदान” या उपक्रमात सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या सहभागामुळे..!
मतदार जनजागृती व राज्यस्तरीय स्वीप प्रक्षेपण (लॉंचिंग) कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीने आज सकाळी निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान (दुर्गादेवी टेकडी) येथे “वॉकेथॉन फॉर मतदान” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्रेया बुगडे यांनी नागरिकांशी संवाद साधला, यावेळी आबालवृद्धांसह नागरिकांनी एकच गर्दी केली. दुर्गादेवी टेकडीच्या परिसरात मतदार जनजागृतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कनिष्ट अभियंता सारिका नागरगोजे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे, अनिल खुराडे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, पियुष घसिंग, सचिन महाजन यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक -युवती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गादेवी टेकडी येथे महापालिकेच्या वतीने आयोजित “वॉकेथॉन फॉर मतदान” या उपक्रमात सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांनी टेकडीवर फिरायला आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक – यवती, माजी सैनिक, नवमतदार, नागरिक यांच्याशी चालता बोलता संवाद साधला. यावेळी मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करताना त्या म्हणाल्या, “मानवी सुदृढ आरोग्यासाठी जसे व्यायाम, योगासने, शारीरिक कवायती महत्वाच्या आहेत तसेच लोकशाहीच्या आरोग्यासाठी मतदान करणे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यासाठी नागरिकांनी निवडणुकीमध्ये आपल्या मताचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मताधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला महत्वपूर्ण हक्क आहे. निवडणुकीत मतदान करण्याची संधी प्रत्येक मतदाराला ५ वर्षाने मिळते. ज्याचा वापर करून आपण आपल्या कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने देशाचे भविष्य उज्वल करू शकतो. मतदारांनी मतदान करण्याची ही अनोखी संधी न गमावता येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मताधिकार बजावावा, असे आवाहन श्रेया बुगडे यांनी केले.