राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांना पंधरा दिवसाची मुदतवाढ!

नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना पंधरा दिवसाची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ द्या असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर वीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार यावर प्रश्नचिन्ह होते.
दरम्यान आज सोमवार 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

