फार्मर स्ट्रीट : आरोग्याच्या दृष्टीकोनातून गांभीर्याने पाहण्यास नक्की मदत करेल

पिंपरी : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला ‘फार्मर स्ट्रीट’ उपक्रम हा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून आरोग्याच्या दृष्टीकोनातून गांभीर्याने पाहण्यास नक्की मदत करेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
या उपक्रमाचा समारोप करतांना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका विविध उपक्रम, कार्यक्रम राबवीत असते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले उत्पादने, फळेभाज्या यांचा वापर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात वाढवा तसेच सेंद्रिय उत्पादनांना विक्रीसाठी मंच उपलब्ध करून देऊन नागरिकांसाठी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध करून देणे, यासाठी ‘फार्मर स्ट्रीट’ हा उपक्रम आयोजित केला आहे. ‘फार्मर स्ट्रीट’ उपक्रम महापालिकेचा प्राथमिक प्रयोग असून यापुढे देखील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील. तसेच नागरिकांनी सेंद्रिय उत्पादनांचा आपल्या दैनदिन जीवनात उपयोग केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या आरोग्यामध्ये दिसेल, असेही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि मेसर्स अर्बनली यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे ‘फार्मर स्ट्रीट’ या दोन दिवसीय उपक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, माजी नगरसदस्य शत्रुघ्न काटे, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, अर्बनली संस्थेचे अलोक कठार, महापालिकेचे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
दरम्यान, चित्रकार वैशाली भानसे यांनी महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फार्मर स्ट्रीट या उपक्रमाचे लाईव चित्र रेखाटले होते. या चित्राचे अनावरण देखील अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात मावळा संस्थेचे अनिरुद्ध राजदेरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, खेळीमेळीच्या माध्यमातून महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारा “रणांगण” हा खेळ सादर केला. या खेळामध्ये लहान मुलांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.