कोणत्याही कार्यात नैतिक आचरण महत्त्वाचे : अण्णा हजारे

प्रा. डॉ. पांडुरंग भोसले स्नेहबंध पुरस्काराने सन्मानित
पिंपरी : ‘कोणत्याही कार्यात नैतिक आचरण महत्त्वाचे असते! यासाठी आचार आणि विचार शुद्ध असले पाहिजेत!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे रविवार, दिनांक १३ जुलै रोजी काढले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित कविराज उद्घव कानडे आणि डॉ. अशोक शीलवंत स्मृती स्नेहबंध पुरस्कार प्रदान करताना अण्णा हजारे बोलत होते.

महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील प्रभारी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांना स्नेहबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राजू तनवाणी आणि प्रकाश कुंभार यांनाही सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कल्पना शीलवंत, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. पांडुरंग भोसले यांनी, ‘समाजासाठी जीवन समर्पित केलेल्या आदरणीय विभूतीच्या हस्ते सन्मानित झाल्यामुळे मनात कृतार्थतेची भावना आहे!’ अशी भावना व्यक्त केली. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. अशोक सहकारी बँकेचा कर्मचारीवर्ग आणि महात्मा फुले महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संगीता अहिवळे यांनी आभार मानले.