फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील हवा प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्र्यांना साकडे!

पिंपरी-चिंचवडमधील हवा प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्र्यांना साकडे!

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. उपनगरांमध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहे. धूळीचे साम्राज्य आणि हवा प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी. तसेच, हवा प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी पर्यावरण मंत्री मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला आणि हवा प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. वातावरणातील सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे, ॲलर्जीचे आणि श्वसनासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे. यासह नैसर्गिक जीवनमानावर परिणाम: सिमेंटच्या धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून, नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे, ही बाब गंभीर आहे.

सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळाले पाहिजे. परंतु, पिंपरी-चिंचवडसह वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात. वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा. रस्त्यांची नियमित २ वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई केली जावी. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे, एअर गन द्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा मारला जावा. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी. रस्त्यांवरील झाडांची देखभाल आणि पाणी नियमित करावे, यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था यांना आदेश द्यावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.


हवा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक
बुधवार, दि. 12 मार्च 2025 रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये हवामान खात्याच्या एअर कॉलिटी इंडेक्सनुसार, गवळीनगर : 127, पार्क स्ट्रिट वाकड : 140, थेरगाव : 127, भोसरी 260, भूमकरनगर : 271, ट्रान्सपोर्टनगर निगडी : 140 असा हवा गुणवत्ता निर्देशांक आहे. मानवी आरोग्यासाठी किंवा निसर्ग परिसंस्थेसाठी 0 ते 50 असा हवा गुणवत्ता निर्देशांक चांगला मानला जातो. 0 ते 100 पर्यंत मध्यम आणि 100 ते 200 पर्यंतचा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे नागरी आरोग्यावर वाईट परिणाम करणारा आहे. माझ्या पिंपरी-चिंचवड शहरात एकाही ठिकाणी AQI 50 पेक्षा कमी नाही, ही बाब चिंताजनक आहे.

ठोस उपाययोजना आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता
पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील हवा प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असून, त्या दृष्टीने पर्यावरण विभागाची उच्चाधिकार समितीची बैठक नियोजित करावी. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांना सूचना मांडण्याची संधी मिळावी, अशी आग्रही मागणी आहे. यावर महायुती सरकार आणि पर्यावरण विभागाच्या वतीने सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"