अभियंत्यांना देण्यात आले “खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली” वापर प्रशिक्षण!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम, १५७ अभियंत्यांनी घेतले प्रशिक्षण
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यात पडणाऱ्या तसेच इतर खड्यांचे निराकरण करण्यासाठी व नागरी सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी महापालिकेच्या अभियंतांना “खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली” वापर व खड्डे भरण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले.

ऑटो क्लस्टर येथे झालेल्या या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराला महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण व शहर दळण वळण विभागातील कार्यकारी अभियंते, उप अभियंते, कनिष्ठ अभियंते, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असे एकूण १५७ अभियंते सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून या अंतर्गत इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे रस्त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यास अभियंत्यांना देखील मोठी मदत मिळणार आहे. ही प्रणाली नागरिकांची जीवन शैली सुरक्षित करणारी आहे. तसेच महापालिकेच्या डिजिटल व तत्पर प्रशासकीय सेवेची साक्ष देणारी ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली” वर खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी अभियंत्यांना देखील या प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे. या उद्देशानेच महापालिका व इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत एकूण १५७ अभियंतांना प्रशिक्षण देण्यात आले.
तज्ज्ञ सल्लागार विकास ठाकर यांनी हे प्रशिक्षण दिले असून उप अभियंता अश्लेष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
प्रशिक्षणात वैशिष्ट्ये
पॉटहोल मॅनेजमेंट’ अॅप वापर कसा करावा, याबाबत माहिती देण्यात आली.
जलनिरोधक खड्डे भरणी तंत्रज्ञानानाबाबत माहिती
तक्रारीवर तात्काळ प्रतिसादासाठी असणाऱ्या ऑटो मेकॅनिझम प्रणालीबाबत माहिती
रस्ता, जलनि:सारण व पाणी पुरवठा अशा विभागातील समन्वयाचे नियोजन

