चिखली व तळवडे भागातील अतिक्रमणे हटविली!

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली चौक ते सोनावणे वस्ती आणि देहू आळंदी रस्ता ते सोनावणे वस्ती चौक या रस्त्यांवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन्ही रस्त्यांवरील सुमारे ३९ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्र रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
पहिल्या टप्प्यात चिखली चौक ते सोनवणे वस्ती या २४ मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत एकूण २ हजार ५५० मीटर लांबीच्या रस्त्यावरील ३० हजार ६०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात चिखली ते देहू-आळंदी रस्ता ते सोनवणे वस्ती चौक या ३० मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे १ हजार ३६० मीटर लांबीचा रस्ता मोकळा होऊन ९ हजार चौरस मीटर सार्वजनिक जागा मोकळी झाली. तसेच १७ मार्चपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असून यामुळे पुढील काही दिवसांत रस्ते विकासाच्या कामांना गती मिळणार आहे.
क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता विजय वायकर, उप अभियंता संजय जाधव, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, २ विद्युत अभियंता, २ विद्युत टेक्निशियन, बांधकाम परवानगी विभागाचे २ उपअभियंता, २ उप पोलीस निरीक्षक, ९ पोलीस कर्मचारी, ५८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच अतिक्रमण कारवाई पथक उपस्थित होते. याशिवाय, ६ पोकलेन आणि ६ जेसीबी निष्कासनाच्या कारवाईसाठी वापरण्यात आले.
चिखली व तळवडे भागात झपाट्याने शहरीकरण होत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात नियोजित पायाभूत सुविधा निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसाठी सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविणे हा त्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा असून यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील महत्वाचे आहे.-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका