विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाडू माती आणि कागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या

कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे, पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देणे, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.
कार्यशाळेत शिक्षक व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. मूर्ती घडवताना कोणती काळजी घ्यावी, आकारनिर्मिती करताना कोणते बारकावे पाळावेत, मूर्तीची सुरक्षित देखभाल कशी करावी, तसेच मूर्ती विसर्जन करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतींचा अवलंब कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फक्त गणेशमूर्ती बनविण्याची कला नाही तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही समजावून सांगण्यात आली. शाळांमध्ये आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाडू माती व कागदापासून प्रत्यक्ष काम करताना त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविधरंगी बाप्पा साकारले.