“भानुदास एकनाथ पुरस्कार” सदानंद मोरे यांना जाहीर

मिशनतर्फे संत एकनाथमहाराजांचे नावे देण्यात येणारे २०२५ चे सहा पुरस्कार जाहीर
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : संत एकनाथ महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण ही सामाजिक संस्था इ. स. २००६ पासुन कार्यरत आहे. संस्थेद्वारा आजपर्यंत अनेकानेक उपक्रम राबविण्यात आले असून इ.स. २०१८ पासून संत एकनाथ महाराजांचे नावे प्रतिवर्षी एकूण सहा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
यंदाचा सर्वोच्च “भानुदास एकनाथ पुरस्कार” संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात येणार असून श्रीफळ, ताम्रपट मानपत्र, नाथांचा फेटा, रुपये पंचवीस हजार, नाथांची मूर्ती, एकनाथी भागवत असे पुरस्काराचे स्वरूप राहील.
संत एकनाथमहाराज ट्रस्टचे संस्थापक व अधिपती नाथवंशज हभप वै. श्री रंगनाथबुवा ऊर्फ भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नावाने देण्यात येणारा दुसरा “वारकरी भूषण पुरस्कार” हा श्री नेकनूरच्या बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती हभप श्री लक्ष्मणमहाराज मेंगडे यांना देण्यात येणार आहे.
श्री संत एकनाथमहाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार हा श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार हभप श्री संजयनाना धोंडगे यांना, संत एकनाथमहाराज स्वरमार्तंड पुरस्कार हा वारकरी संप्रदायातील जेष्ठ उपासक आळंदी येथिल हभप श्री आबामहाराज गोडसे यांना, संत एकनाथमहाराज तालमार्तंड पुरस्कार हा पुणे येथील मृदंगाचार्य श्री तुकारामजी भुमकर यांना तर संत एकनाथमहाराज वारकरी सेवा पुरस्कार हा पैठण येथे नाथ समाधी मंदिर परिसरात भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून विनामोबदला सायंकाळी अन्नदानाची सोय करणाऱ्या श्री राजूसेठ लोहिया यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गावातील नाथमंदिर परिसरातील श्रीसंत नरहरी सोनार महाराज संस्थान येथे संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हभप श्री योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी केले आहे.