पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा इशारा!

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘स्क्रीप्ट’वर बोलू नका!
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्क्रिप्ट’च्या आधारे एजन्सीच्या सल्ल्याने बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या काळात शहरात काय झाले आणि भाजपाच्या सत्ताकाळात काय विकासकामे केली हे आम्ही सांगतो. पण, ‘‘देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका..’’ असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक- 2026 च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभरंभ केला. यावेळी चव्हाण बोलत होते. या प्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महामंत्री राजेश पांडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना माजी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 17 मधील) ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, (प्रभाग क्रमांक 32) सुषमा तनपुरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, तसेच संदिप श्रीधर वाल्हेकर यावेळी भोसरी विधानसभेतील भरत लांडगे, शिवसेना उबाठा पिंपरी-चिंचवड शहर संघटक संतोष वाळके, उपविभाग प्रमुख अविनाश लोणारे, भाऊसाहेब काटे, भोसरी विधानसभा समन्वयक साईनाथ ढाकणे, मनोज परांडे, राजकुमार बांगर, शाखाप्रमुख प्रिमशिल पोटभरे, सचिन नायकुडे, राष्ट्रवादीचे अनवर शेख, सरचिटणीस अजहर खान, आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
खोटा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न…
रविंद्र चव्हाण म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता कायम लोकांच्या सेवेत आहे. सेवेतून संघटन आम्ही पुढे नेत आहोत. केंद्र व राज्य सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मोदी सरकार, फडणवीस सरकारला लोकप्रियता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे खोटा नॅरेटिव्ह केला. तसा आता काहीलोक महापालिका निवडणुकीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोकांना एजन्सीज् स्क्रिफ्ट लिहून देतात. एजन्सीज भाड्याने घ्यायच्या आणि पैसा जक्कड आहे. त्यामुळे हजार-दोन हजार लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोल करायला पैसे द्यायचे. मी किती पॉप्युलर आहे, हे दाखवण्यासाठी काहीपण करायला लोक तयार आहेत, असा घणाघातही चव्हाण यांनी केला .

