लाडकी बहीण वरून अजित पवार – मुख्यमंत्र्यांमध्ये वाद

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हे नाव वगळत अजित पवार लाडकी बहीण योजना असे प्रसिद्ध केल्याने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातील महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने आमदार रवी राणा यांनी मतदान करा अन्यथा पैसे परत घेऊ असे विधान केले आणि एकच वादंग उठला. तर आता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत अजित पवारांची लाडकी बहीण अशी जाहिरात प्रसिद्ध केल्याने लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यातच काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना मंत्री मंडळाच्या बैठकीत रंगल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली.
शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं जात नसल्याचा आक्षेप घेतला. अजित पवारांची जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यात जर कधी शॉर्टकटमध्ये नाव घेतलं तर काय बिघडलं? अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यभर ‘अनाथांचा नाथ.. एकनाथ’ असे बॅनर लागले. तेव्हा आम्ही म्हटलं का? अजित पवारांचं नाव का नाही घेतलं? असे अजित पावार गटाचे म्हणणे आहे .