दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानाची शपथ मतदान करण्याचा केला निर्धार!

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम
पिंपरी : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मतदानाची शपथ घेतली,
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महानगरपालिकेच्या उप आयुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, राजेंद्र वाघचौरे, सोनाली नवांगुळ, डॉ. विना तारकुंडे, डाॅ.वीणा त्रिपाठी,संगीता जोशी,ब्रॅन्ड ॲम्बेसिडर अक्षय सरोदे यांच्यासह शहरातील दिव्यांग बांधव, त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदानासाठी दिव्यांग बांधवाना देण्यात येणाऱ्या सुविधा:-
१. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करणे.
२. सक्षम ॲप (Saksham App) च्या अनुषंगाने संबंधित अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
३. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर इ. अनुषंगिक सोयी सुविधा पुरविणे.
४. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मतदानासाठी तसेच स्वचतागृह येथे ने आण करण्याकरीता सहाय्यक उपलब्ध.
५. प्राथमिक आरोग्य सुविधा, पोलिस, अग्निशमन हेल्पलाइन, २४×७ आरोग्य विभाग कक्ष.
६. मतदान कर्मचारी यांचेसाठी आवश्यक औषधे, सुविधा पुरविणे.
७. आपत्ती संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क व समन्वय राखणे.


