“हा श्री गणेशाचा आशीर्वाद“

श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. रघुनाथ माशेलकर यांची भावना
फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, अशा भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केल्या.
भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार डॉ. माशलेकर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र अमेय माशेलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. माशेलकर यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. मानपत्र, सन्मानचिन्ह, धनादेश, श्री मोरया गोसावी महाराजांची प्रतिमा आणि शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार सोहळ्यासाठी पाठवलेल्या लेखी संदेशात डॉ. माशेलकर यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
या पुरस्कार सोहळ्यास चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे, ॲड. नरेंद्र देव, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड म्हणाले की, देशाची शोभा ही देशातील विद्वानांमुळे आहे. त्यामुळे देशात विद्वान निर्माण व्हायला हवेत. आणि त्या विद्वानांकडून देशाची व समाजाची सेवा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या काळात एक संस्कारक्षम आणि विद्वान पिढी निर्माण होण्यासाठी लहान मुलांना शालेय शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देण्याचीही अत्यंत महत्वाचे आहे. गेल्या दशकभरापासून भारत देशाला एक सशक्त देश बनविण्याच्या पवित्र विचारधारेने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अतिशय चांगले काम करत आहे. त्यांच्या या कार्यात योगदान देणे हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आज ज्या पुरस्कार्थींचा सन्मान याठिकाणी झाला त्या सर्वांना या पुरस्काराच्या रूपाने श्रीमोरया गोसावी महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला आहे. त्यांच्या हातून यापुढेही देशाची आणि समाजाची अशीच सेवा घडत राहो अशा सदिच्छा, त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विश्वस्त केशव विद्वांस यांनी केले.
‘श्री मोरया गोसावी महाराज’ पुरस्काराचे मानकरी
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यासाठी सुशील पाटील, शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील, वास्तु तज्ज्ञ व ज्योतिषाचार्य आनंद पिंपळकर, कायदेशीर सल्लागार ॲड. प्रियांका जोशी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी तलोळे, हिंदू धर्मजागृती कार्याबद्दल चंद्रकांत शिंदे, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी श्रीमती अंजू सोनवणे, नृत्य दिग्दर्शक योगेश देशमुख, राष्ट्रीय कराटे पंच अशोक कदम, ज्येष्ठ तबला वादक विघ्नहरी देव, बालयोगी आयुष देव, रमणबाग युवा मंच ट्रस्टचे प्रमुख सागर निपुणगे यांचा ‘श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. तर मंगलमूर्ती पायी पालखीचे सेवक धीरज तलाठी, ओम जोगळेकर, बाळासाहेब मोकाशी, दिवाकर खोले, वेदांचे अभ्यासक जीवन जोशी, रोहित बेलसरे, गुणवंत कर्मचारी अजित मेढेकर यांचा ट्रस्टच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.