Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

देहूतील इंद्रायणी घाटासाठी १३.०८ कोटींचा विकासनिधी! आषाढी वारीसाठी ‘पीएमआरडीए’ची तयारी!

देहूतील इंद्रायणी घाटासाठी १३.०८ कोटींचा विकासनिधी! आषाढी वारीसाठी ‘पीएमआरडीए’ची तयारी!

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी
देहू : आगामी आषाढी एकादशी वारीसाठी देहूमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पूर्णपणे तत्पर झाले आहे. देहू नगरपंचायतीच्या मागणीनुसार इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर घाट या दरम्यान सुरू असलेल्या १३.०८ कोटी रुपयांच्या भव्य आणि अत्याधुनिक नवीन घाट विकासकामांचा दर्जा उत्तम राखत ती वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने कंबर कसली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (दि. १ जुलै) या घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. वारीच्या पवित्र काळात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भूसंपादन आणि जोडरस्त्याचे प्रलंबित प्रश्न देहू संस्थान व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने मार्गी लावण्याचा सकारात्मक संकल्प यावेळी ‘पीएमआरडीए’ने केला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ऐतिहासिक वारसा जपत जुन्या घाटाशी सुसंगत असे देखणे दगडी काम करणे, सुबक पाथ-वे तयार करणे, भक्कम घाट बांधणे, आधुनिक विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण, स्वच्छतागृह निर्मिती आणि भाविकांच्या वाहनांसाठी दोन ठिकाणी सुनियोजित पार्किंग व्यवस्था करणे यांसारख्या विविध सोयी-सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता, घाटाचे १०० मीटरपर्यंतचे भरावाचे काम आणि नदीपात्रातील संरक्षणभिंतीचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. मात्र, कामाच्या ओघात समोर आलेले तांत्रिक अडथळे आणि भूसंपादनाशी संबंधित स्थानिक प्रश्न तातडीने सामोपचाराने मार्गी लावण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

महानगर आयुक्त डॉ. चौधरी यांनी घाटाच्या कामाची बारकाईने पाहणी करत असताना, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना खासगी जागामालकांशी योग्य समन्वय साधण्याचे तसेच देहू संस्थानशी सकारात्मक चर्चा करून रखडलेली जागा व जोडरस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे उर्वरित काम अधिक गतीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करता येईल. विशेष म्हणजे, विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावरही ‘पीएमआरडीए’ने विशेष भर दिला आहे. वृक्षसंवर्धन समितीने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत परवानगीनुसारच आवश्यक तेवढीच झाडे तोडण्यात यावीत, आणि कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या.

या आढावा दौऱ्याप्रसंगी ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपअभियंता संजय पाठक, शाखा अभियंता सौरभ गवारी यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापक, कंत्राटदार आणि सल्लागार उपस्थित होते.

viara vcc
viara vcc

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"