विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत आयुष्यातही घडवा : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वार्षिक स्नेह उत्सव आणि गुणगौरव सोहळा संपन्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात वार्षिक स्नेह उत्सव, गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, तसेच प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शनपर भाषणात पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षण क्षेत्रात अविरत काम करत राहिल्यास सर्व समस्यांना तोंड देऊ शकू असा विश्वास व्यक्त केला. “विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत आयुष्यात चांगला माणूस कसा घडेल यावर लक्ष केंद्रित करावे.” आयुक्त सिंह यांनी पुढे म्हटले की, गेल्या तीन वर्षांत शिक्षण विभागात शिक्षक आणि पालकांच्या मदतीने खूप चांगले बदल घडवून आणले आहेत. “आजही अनेक शाळांच्या खोल्या व मैदानांच्या समस्या आहेत, परंतु येणाऱ्या पाच वर्षांत आपण असेच काम करत राहिलो तर सर्व समस्यांना तोंड देऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले. यावर्षी भोसरी, दापोडी, दिघी येथील शाळांमध्ये डान्स रूम, कला कक्ष, स्टाफ रूम अशा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व पर्यवेक्षकांनी अपेक्षेपेक्षा चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
“शाळा व्यवस्थापन समितीमुळे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामात चांगली मदत होत आहे. आपली शिक्षणाची चळवळ पालक समिती आणि शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांनी निरंतर चालू ठेवली तर आपण मोठा बदल घडवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
आयुक्त सिंह यांनी इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. “सक्षम हा उपक्रम आपल्याला फार काळ चालवायचा नाही कारण येणाऱ्या काळात मौल्यवान बदल घडवणार आहोत. 64 शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. “लवकरच विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे खेळ खेळता येतील आणि लवकरच यावर उपाययोजना करून काम सुरू करणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षक आणि शिक्षण विभागाचे चांगले काम सुरू असल्याचे नमूद केले. “पिंपरी चिंचवड महापालिका चांगल्या दिशेने मार्गक्रमण करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले की, सारथी पोर्टलद्वारे ८८ टक्के तक्रारी निकाली काढल्या आहेत आणि ३५ तक्रारी प्रलंबित आहेत, ज्यांवर देखील लवकरच कारवाई होणार आहे. “जून-जुलैमध्ये पवित्र पोर्टलद्वारे २५० ते ३०० कायमस्वरूपी शिक्षक शाळांना मिळणार आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी प्रास्ताविक करताना २०२४-२५ चा शैक्षणिक आढावा घेत महानगरपालिकेच्या शाळांचे उपक्रम आणि कला, विज्ञान व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या वतीने नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘सामाजिक, भावनिक, नैतिक विकास आणि जीवन कौशल्य’ (SEE LEARNING) या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय गुणवत्ता परिषदेचा (QCI) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा अहवाल सादर करण्यात आला. महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित सोडवण्यात अनेक विद्यार्थी चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून आले.शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शैक्षणिक आणि गुणवत्ता विषयक विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट बालवाडी (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर काळभोर), इंग्रजी माध्यम शाळा (महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा दळवीनगर), तसेच क्षेत्रनिहाय अनेक शाळा यांचा समावेश होता.
विशेष उल्लेखनीय पुरस्कार
अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकनात विजेती शाळा: पी.सी.एम.सी पब्लिक स्कूल प्राथमिक शाळा चन्होळी
शालेय संस्कृती, नेतृत्व आणि व्यवस्थापन विजेती शाळा: पी.सी.एम.सी पब्लिक स्कूल मोशी मुले
विद्यार्थी, पालक आणि समुदाय सहभाग विजेती शाळा: पी.सी.एम.सी पब्लिक स्कूल दिघी कन्या
सर्वोत्कृष्ट प्रगती – प्राथमिक शाळा: पी.सी.एम.सी पब्लिक स्कूल काळेवाडी मुले ५६/२, पी.सी.एम.सी पब्लिक स्कूल कुदळवाडी
सर्वोत्कृष्ट प्रगती – माध्यमिक शाळा: क्रीडाप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, उद्यामनगर
सर्वोत्कृष्ट माध्यमिक शाळा: माध्यमिक उर्दू विद्यालय रूपीनगर, अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर
सर्व विजेत्या शाळांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.