फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

फेक नॅरेटिव्ह कंपनीचे पवार मालक

फेक नॅरेटिव्ह कंपनीचे पवार मालक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शरद पवार हे फेक नॅरेटिव्ह कंपनीचे मालक आहेत आणि सुप्रिया सुळे या कंपनीच्या संचालक आहेत. चुकीचे आणि खोटे आरोप करून फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम ही माणसे करीत आहेत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चढविला.

चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत वाकड येथे ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, अश्विनी जगताप, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने वाढणारे शहर आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी दिले. आणि आता भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. एवढ्या पाण्याने शहराची तहान भागणार नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या धरणातून शहराला पाणी आणण्यासाठी उपाययोजना करू. मी या शहराला पाणी कमी पडू देणार नाही.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, चिंचवड मतदारसंघात ही सभा घेत असताना लक्ष्मणभाऊंची प्रकर्षाने आठवण येते. स्व. लक्ष्मणभाऊंचा या शहराच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यानंतर अश्विनीताई यांनीही कमी वेळेत अनेक चांगले निर्णय घेत विकासकामे केली. लक्ष्मणभाऊंचे चिंचवडच्या विकासाचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवा. जो विश्वास तुम्ही लक्ष्मणभाऊ व अश्विनीताई यांच्यावर दाखवला तोच विश्वास शंकर जगताप यांच्यावर दाखवा, असे आवाहन फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

आज मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचे उद्योग हे पुणे, संभाजीनगर, नाशिकला आले. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात इको सिस्टीम तयार होत आहे. 5 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही एक नवीन योजना आणली आहे त्या योजनेंतर्गत १० लाख तरुणांच्या हाताला काम आणि २५ लाख रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहोत. या माध्यमातून १० लाख तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा पगार हा राज्य सरकार देईल व त्यांना प्रशिक्षण देता येईल.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"