फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

संदिपान भूमरेंच्या ओएसडीकडून 5 लाख रुपयांची मागणी :अमोल मिटकरी

संदिपान भूमरेंच्या ओएसडीकडून 5 लाख रुपयांची मागणी :अमोल मिटकरी

अकोला: राज्यातील मंत्र्‍यांच्या ओएसडींची नावे निश्चित करण्यावरुन सध्या मंत्रालय व राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वीय सहायकांच्या नेमणुकीसंदर्भाने वक्तव्य करताना मुख्यमंत्री कोणाचंच चालू देत नाहीत, असे म्हटले होते. त्यानंतर, मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्यालाही एका मंत्र्यांच्या ओएसडींकडून 5 कोटींच्या एका कामासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तत्कालिन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरेंच्या ओएसडीसंदर्भात आपणास हा अनुभव आल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहीत नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांनी नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा ‘फिक्सर लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले आहे. मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेचं मिटकरी यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. आधीच्या शिंदे सरकारमधील रोजगार हमी विभागाच्या एका ओएसडी संदर्भात हा अनुभव आल्याचे त्यांनी म्हटले.

स्वीय सहायकांवर सीएमओंची नजर
मंत्र्याकडे सध्या जे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले आहेत ते पुढील पाच वर्षे राहतीलच असे नाही, त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागणार आहे. या शिवाय ‘उसनवारी’ (लोन) तत्त्वावर आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांना चाप बसविला जाण्याची शक्यता आहे. मंत्री कार्यालयांमधील पीए, पीएस, ओएसडी नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"