मोहननगर, आकुर्डी, काळभोरनगर भागात नवीन ट्रांन्सफार्मरसाठी निधी देण्याची मागणी!

मारुती भापकर यांचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन
पिंपरी : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोहन नगर, आकुर्डी, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, रामनगर या विभागात नवीन ट्रांन्सफार्मर बसविण्यासाठी महावितरणच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली .

मोहननगर, आकुर्डी काळभोरनगर चिंचवड स्टेशन, आनंदनगर, साईबाबा नगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर रामनगर दत्तनगर विद्यानगर या विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे या विभागातील नागरिक मागील दोन वर्षापासून खूप त्रस्त आहेत. या समस्येमुळे येथील नागरिकांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते.
या विषयाच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मोहननगर येथे दोन ३०० के व्ही चे ट्रांसफार्मर, काळभोर नगर येथे ३०० के. व्ही ट्रांसफार्मर, चिंचवड स्टेशन येथे ३०० के. व्ही ट्रांसफार्मर, आकुर्डी गाव येथे ३०० के.व्ही तसेच ३००,२४०,१२० स्वे.एम एम. लघुदाब वाहिनी नवीन टाकणे, काही ठिकाणी उच्च दाबबाहिनी नवीन टाकण्याचे काम होणे खूप महत्त्वाचे आहे.
याबाबत या मागण्यांपैकी मोहननगर व काळभोरनगर येथे नविन ट्रान्सफार्मर व अधिक क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेला आहे तरीही समस्या आहे तशाच आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भोसरी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून या कामांसाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीत अशी कारणे सांगितली जातात. वरील विभागातील ट्रांसफार्मर वर येणाऱ्या लोडमुळे एसटी व एल टी वाहिन्या गरम होऊन त्या ब्रेक होतात. तसेच या विभागात अंडरग्राउंड एलटी वाहिन्या जुन्या झाल्यामुळे त्या हि ब्रेक होतात. मोहन नगर, आकुर्डी, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, रामनगर या विभागात नवीन ट्रांन्सफार्मर बसवने, नवीन एल टी, एस टी वाहिन्या टाकणे, विभागीय कार्यालयात असणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे, कर्मचारी वाढवणे आदि कामांसाठी आपण स्वतःहा लक्ष घालून लागणारा निधी तातडीने महावितरण ला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

