रावेत बंधाऱ्याच्या जागी नवीन आधुनिक बंधाऱ्याची मागणी : आमदार शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे लेखी मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साडेचार मीटर उंचीचा नवा सुसज्ज बंधारा बांधण्यात यावा, अशी लेखी मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे समक्ष भेट घेऊन केली.

या पत्रात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत रावेत बंधाऱ्यातून दररोज पिंपरी-चिंचवड महापालिकेला ४८० एमएलडी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हा बंधारा सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश कालखंडात बांधण्यात आला असून आज तो मोठ्या प्रमाणावर गाळाने भरला आहे. यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. जुन्या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.
शहरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि औद्योगिक विकास लक्षात घेता, सध्याच्या बंधाऱ्याची क्षमता अपुरी ठरत आहे. रावेत बंधाऱ्यात सध्या केवळ एक दिवसापुरते पाणी साठवले जाऊ शकते. शहराच्या वाढत्या गरजांसाठी किमान ३ ते ४ दिवस पुरेल असा जलसाठा राखून ठेवण्याची गरज असल्याचे आमदार जगताप यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. नवीन बंधाऱ्याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सुचवले की, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, साडेचार मीटर उंचीचा बंधारा बांधल्यास गाळ साचण्याचे प्रमाण कमी होईल.
रावेत बंधारा येथे गाळ साठल्याने जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणि शुद्धीकरण केंद्राला खर्च जास्त वाढतो. भविष्यात तो महानगरपालिकेचा खर्च कमी होणार आहे, याकडे आमदार जगताप यांनी लक्ष वेधले.