तुळजाभवानी मंदिरात 1 ते 10 ऑगस्ट मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद!

देवीचे मुखदर्शन मात्र चालू राहणार
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता एक ते 10 ऑगस्ट या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. येथील तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन मात्र चालू राहणार आहे .मंदिर प्रशासनाच्या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजन ,अभिषेक पूजा, नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थान कडून देण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्वाराचे काम सुरू आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे .पुढील दहा दिवस भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता येईल .मंदिरात सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता .चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचे काम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते मंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे असल्याची माहिती देत यापूर्वी संभाजीराजांनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता पुरातत्त्व विभागाकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.

