सायबर फसवणूक झालेली 56 लाख रुपये तक्रारदारास परत!

सायबर पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई.
पिंपरी : भोसरी येथील Phbb valves pvt ltd या कंपनीची एक महिन्यापूर्वी बनावट ई-मेलद्वारे सुमारे 56 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. सायबर पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली आहे अशी माहिती पोलीस उपयुक्त गुन्हे शिवाजी पवार यांनी दिली आहे.

फसवणूक झालेले पब व्हॉल्यूस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक संजय जाधव यांनी याबाबत सायबर फसवेगिरी बाबत तक्रार दाखल केली होती. ही कंपनी हार्डवेअरचे काम करते. त्याकरिता परदेशातील wenzhou artech machinery co.ltd या कंपनीबरोबर त्यांचे व्यवहार चालू होते . त्यांच्या कंपनीची माहिती काढून अज्ञात व्यक्तीने तक्रारदार यांच्या कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने wenzhou artech machinery co.ltd या कंपनीशी साधर्म्य असलेला नवीन ई-मेल आयडी बनवून त्यावरून कंपनीचे बँक खाते डिटेल्स बदलून इतर बाहेर देशातील बँक अकाउंट नंबर देऊन त्यावर हे नवीन बँक खाते असून यापुढे या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. तक्रारदारास हा ई-मेल खरा असल्याचे वाटल्याने सहा एप्रिल 2026 रोजी तक्रारदाराने 56 लाख रुपये सिटीजन बँक यूएसए येथील बँक अकाउंट वर पाठवले होते .
त्यानंतर तक्रारदार यांनी wenzhou artechmachinery technology company.ltd या कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून पैसे आले का याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमचे बँक अकाउंट बदललेले नसून आम्ही सदर रक्कम मागणी केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांची खात्री झाली की, आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली व त्यानंतर भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून ज्या बँक खात्यावर ही रक्कम पाठवण्यात आली. ती रक्कम फ्रिज करून तक्रारदार यांना परत करणेबाबत बँक अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून सदर रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अज्ञात इसमाने दिलेले बँक खाते हे सिटीजन बँक ही अमेरिका या बाहेरील देशातील असल्याने पत्रव्यवहार करण्यात व समन्वय ठेवण्यात अडचणी येत होत्या परंतु त्यांना या घटनेची सविस्तर माहिती देऊन तक्रारदार यांची सायबर फसवणूक झालेली आहे असे सांगण्यात आले. सदर रक्कम परत देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. तक्रारदार जाधव यांची गेलेली सर्व 56 लाख रुपये रक्कम पुन्हा त्यांच्या बँक खात्यावर प्राप्त झाली आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे डॉक्टर शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे महिला पोलीस हवालदार रेणुका वावळ दीपक भोसले विनायक मस्कर पोलिसांबलदार सोपान बोदवड व सर्व सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे

