सीआरपीएफ जवानाची 6 लाखाची फसवणूक!

पिंपरी : एसबीआय बँकेचे उर्वरित कर्ज फेडण्याच्या बहाण्याने बँक मॅनेजर असल्याचे भासवून सायबर भामट्याने जवानाच्या बँक खात्यातून 6 लाख रुपये परस्पर लांबविले. ही घटना बुधवार 23 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्प मध्ये घडली.

दिनेश कुमार प्रेमचंद शर्मा (वय 57, रा. सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे, मूळ – बागपत, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. अजय (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा यांनी एसबीआय बँकेच्या कर्जासंदर्भात गुगल वरून मिळालेल्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपीने आपण बँकेचा मॅनेजर असल्याचे भासवले. त्याने शर्मा यांच्या व्हाॅट्सॲपवर एक फॉर्म पाठवून तो भरून घेतला. त्यानंतर त्याच्या मोबाईलचा ताबा मिळवून सहा लाख रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

हल्दीराम शॉपचे लॉक तोडून चोरी!
पिंपरी : हल्दीराम शॉपचे डिलिव्हरी विंडोचे लॉक तोडून शॉप मध्ये प्रवेश करून गोदरेज कंपनीची तिजोरी व त्यातील रोख रक्कम असे एकूण 28 हजार 300 रुपयाची मालमत्ता चोरी करण्यात आली. ही घटना शॉप नंबर 2/3 ,स्पॉट 18 मॉल, जगताप डेअरी जवळ, पिंपळे सौदागर येथे घडली.
या प्रकरणी महेश शिवाजी कदम (वय 26, रा. रूम नंबर 303, कृष्णा पार्क सोसायटी, काळभोरनगर, चिंचवड यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद. दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे हल्दीराम शॉप, शॉप नंबर 2/3 स्पॉट 18 मॉल, शॉपचे डिलिव्हरी विंडोचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शॉप मधील गोदरेज कंपनीची तिजोरी व त्यातील रोख रक्कम अशी एकूण 28 हजार 300 रुपयांची मालमत्ता चोरी करण्यात आली. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे तपास करीत आहेत.

