मोशी येथील नवीन न्यायालयाचे बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार : अण्णा बनसोडे

पिंपरी : मोशी येथे सुरू नवीन न्यायालय इमारतीचे बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बैठक घेतली. बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला घावटे यांनी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ४० टक्के होत आलेले असून येत्या डिसेंबर २०२५पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन पुढील एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले. सदर बांधकामासाठी यावर्षी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे; तसेच उर्वरित बांधकामासाठी अजून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे सांगितले . उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

सदरची बैठक झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांची मुंबई येथे उच्च न्यायालयात भेट घेऊन सदर बैठकीचा आढावा आणि सर्व माहिती त्यांना देण्यात आली. निधीबाबत त्यांनी उच्च न्यायालयामार्फत शासनाला लवकरच माहिती देण्यात येईल याबाबत ग्वाही दिली. मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांना माहिती देऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे स्वतः लवकरच मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहेत.
सदरच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटना अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे, पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. अजिंक्य लोमटे, ॲड. सय्यद सिकंदर अली यांनी उपस्थित राहून चर्चा केली. न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन न्यायालयाच्या संख्येत वाढ होणार असल्याने तसेच जिल्हा व सत्र न्यायालय लवकरच पिंपरी – चिंचवड शहरामध्ये येणार असल्यामुळे समस्त पिंपरी – चिंचवडमधील वकील आणि नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत असल्याचे ॲड. अतिश लांडगे व माजी अध्यक्ष ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील यांनी सांगितले.

