फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

घरकुल प्रकल्पातील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत संपन्न!

घरकुल प्रकल्पातील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत संपन्न!


पिंपरी : स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो, महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत असते. चिखली येथील घरांचा ताबा मिळणार असलेल्या लाभार्थ्यांनी सदनिकांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेऊन या सदनिकांचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करावा तसेच सदनिका भाड्याने देणे, इतरांना वापरासाठी देणे असे प्रकार टाळावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी लाभार्थ्यांना केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत गोर गरिबांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळाव्या यासाठी चिखली येथील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील १७८ व्या इमारतीमधील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या घरकुल सोडतीस उपआयुक्त अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, सह शहर अभियंता विजयकुमार काळे, काँप्युटर प्रोग्रामर अनिल कोल्हे, मुख्य लिपिक सुनील माने, भागवत दरेकर, योगिता जाधव, विनायक रजपूत यासह महापालिका कर्मचारी, घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातून शहरात कामासाठी स्थायी झालेल्या नागरिकांना भाड्याने किंवा झोपडपट्टी परिसरात राहावे लागते.परंतु भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना भरमसाठ प्रमाणात भाडे भरावे लागत असल्याने स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देत असून त्यांना त्यांचे मुलभूत हक्क मिळवून देण्यास मदत होत आहे. आज झालेल्या चिखली येथील संगणकीय सोडतीत ज्यांना सदनिका प्राप्त झाल्या आहे त्यांना अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत चंद्रकांत इंदलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

घरकुल योजनेच्या माध्यमातून सदनिका वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सदनिकांमध्ये आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या सदनिकांचा वापर स्वतः करून सदनिकांमध्ये आणि सदनिकांच्या भोवताली स्वच्छता राखावी असे उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"