फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
अध्यात्म

जीवन साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम

जीवन साध्य करायचे असेल तर त्यासाठी  प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम

माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी
पिंपरी : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे आहे, असे सांगत ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांचे बीजेनिमित्त कीर्तन झाले.

संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आयोजित गाथा पारायण आणि कीर्तन सप्ताहात बीजेच्या दिवशी त्यांची कीर्तन रुपी सेवा झाली .
कीर्तनासाठी घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन ॥१॥ हा अभंग घेतला.

कदम महाराज म्हणाले की, शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा सुरू झाला म्हणूनच हा सोहळा यशस्वी झाला. भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या तुकाराम महाराज मंदिराच्या कामाला गती मिळावी म्हणून सोहळा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी घेण्याची सूचना अमलात आणली. सुरुवातीला सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः टाळकरी, भाकरी बनवून देणाऱ्या महिला, पोळ्या, मांडे बनवणाऱ्या महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भंडारा डोंगर समितीला ही त्यांनी धन्यवाद दिले.

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) भंडारा डोंगर समितीचे प्रमुख बाळासाहेब काशिद उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला मिळालेला पुरस्कार सर्व वारकरी धारकरी व लाडक्या बहिणींना समर्पित करतो. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भंडारा डोंगर हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. नद्या प्रदूषण रोखण्यासाठी लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे.

उपमुख्यमंत्र्यांकडे समोर मांडल्या वारकऱ्यांच्या मागण्या
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शांती ब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांचे गुरुपूजन झाले. नंतर बाबांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. कदम माऊली यांनी वारकऱ्यांच्या वतीने इंद्रायणीच्या स्वच्छतेची मागणी केली. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याला वारकरी भवन व्हावे, वाखरीला मोकळ्या जागेत काँक्रीट व्हावे, भंडारा संस्थांनाला भोवतालची जागा जोडून द्यावी, वारकरी संप्रदायातील पद्मश्री पुरस्कार कुऱ्हेकर बाबांना मिळावा अशी मागणी केली.

कदम महाराज म्हणाले की, धन्य म्हणून घेईन अशी प्रतिज्ञा अभंगात तुकाराम महाराजांनी केलेली आहे. जीवनात काही साध्य गाठायचे असेल तर जीवनात प्रतिज्ञा केली पाहिजे. तीन प्रकारच्या प्रतिज्ञा सांगितल्या आहेत. जीवप्रतिज्ञा, देवप्रतिज्ञा आणि संत प्रतिज्ञा. यातील जीवाची आणि देवाची प्रतिज्ञा कडेला जात नाही पण संतांची प्रतिज्ञा कडेला जाते. उदाहरण म्हणून रामशास्त्री प्रभुणे यांनी केलेल्या प्रतिज्ञाचा दृष्टांत महाराजांनी सांगितला.

अभंगाचे चिंतन सांगताना कदम माऊली म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की, मी लोकात असा कीर्तन भक्तीचा महिमा वाढविन आणि असे रस पूर्ण कीर्तन करीन की जे ऐकण्याकरता ब्रह्मज्ञान्याला देखील लाळ गोठण्यास लावीन. मुक्ताला आपली स्थितप्रज्ञ अवस्था टाकून देण्यास लावीन कारण कीर्तनाने शरीर देखील ब्रह्मरूप होते व भाग्य एवढे वाढते की देवासारखा ऋणी दास होतो.

माऊली महाराजांनी सांगितले की, यज्ञ आणि दान साधनांना लाजवून सोडीन. भक्तीची जी शेवटची भाग्य मर्यादा आहे ती मर्यादा गाठून, त्या बळाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ संपादन करीन आणि वेदात सांगितलेला जो जीवब्रह्मऐक्य रूप गुह्यार्थ त्याचेही ज्ञान करून घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, इहलोकातील लोकांकडून मी धन्य म्हणवून घेईन व आमचे मोठे भाग्य म्हणून आम्ही या मृत्यूलोकात श्री तुकाराम महाराजांना डोळ्यांनी पाहिले असेही म्हणवून घेईन.

कीर्तनाच्या उत्तरार्धात महाराजांनी वैकुंठ गमनाचा अभंग घेतला.
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥

संत तुकाराम महाराजांनी सनकादिकांना विनंती केली की तुम्ही देवाकडे माझी आठवण काढा. निरोप द्या आणि मला नेण्यासाठी मूळ पाठवा. नंतर गरुडाला विनंती केली की तुम्ही लवकर देवाला घेऊन या. लक्ष्मीला विनंती की तुम्ही देवाचे पाय सोडा. लक्ष्मी म्हणाल्या मी पाय सोडले पण देव योगनिद्रेत आहे मग शेषाला विनंती केली की तुम्ही देवाची योग निद्रा घालवा.शेष हलले देवाला जाग आली. देव तुकाराम भेटायला आले.

चार युगातील भक्त देवासोबत होते. देवांनी सर्व नद्यांना इंद्रायणीत आणले. यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणीस मिळाल्या. जगद्गुरु तुकोबाराय काळाच्या मस्तकावर पाय देऊन तुकोबा विमानात बसले. जगद्गुरु तुकोबारायांचा 375 वा वैकुंठ गमन सोहळा महाराजांनी कीर्तनातून सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून एक कोटींची देणगी
भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने तसेच माऊली कदम यांनीही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी आमदार विलास लांडे यांनी एक कोटी रुपयांची देणगी भंडारा डोंगराला देऊ केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"