आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अभिरक्षा व निवडणूक साहित्य कक्षाची केली पाहणी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व अडथळाविरहीत पार पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी अभिरक्षा कक्ष (Strongroom) तसेच निवडणूक साहित्य कक्षाची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान ईव्हीएम मशिन्सची साठवणूक, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच वापरापूर्वी व वापरानंतरच्या प्रक्रियांची माहिती घेण्यात आली. मतदान केंद्रांपर्यंत ईव्हीएम मशिन्स व संबंधित साहित्य पोहोचवताना तसेच मतदानानंतर ती सुरक्षितरीत्या परत आणताना कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या. यावेळी निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित शाखांचे प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आली आहेत. पिंपरी येथे दाखल झाल्यानंतर सर्व वाहनांच्या सीलबंद स्थितीची खातरजमा करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रे अभिरक्षा कक्षामध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आली आहेत. या अभिरक्षा कक्षाची पाहणी करताना आयुक्त हर्डीकर यांनी ईव्हीएम मशिन्स हाताळताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे, मशिन्सच्या सीलिंग, तपासणी व चाचणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखणे, तसेच कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येकाने आपली जबाबदारी गंभीरतेने व नियमानुसार पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले. तसेच निवडणूक साहित्याची योग्य नोंद, साठवणूक व वितरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबतही खबरदारी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या.
याशिवाय, निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी नियमांचे पालन करून काम केल्यासच लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. तसेच महापालिका प्रशासनाच्या या तयारीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ शांततेत, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

