आचारसंहितेची एैशी की तैशी; सर्वच प्रभागात रोख रकमेचे व साहित्याचे वाटप!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शहरात मतदारांना विविध प्रकारची लालूच दाखवून जवळपास सर्वच प्रभागात रोख रकमेचे व साहित्याचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मात्र पोलिसांच्या गुप्त पथकाला या पैसे वाटपावर व साहित्य वाटपावर नियंत्रण ठेवण्यास अपयश आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात चार हजारांपासून 8000 पर्यंत एका मतदाराला रोख रकमेचे वाटप करण्यात आले. याशिवाय

साहित्याचे वाटप देखील मोठ्या प्रमाणात झाले. मात्र पैशाचे वाटप रोखण्यास पोलिसांच्या गुप्त पथकाला यश आले नाही. पिंपरी चिंचवड हे जलद गतीने विकसित होत असलेले शहर असून शहरात अन्य जिल्ह्यांमधून अन्य राज्यांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायीक झाले आहेत. विशेष करून सोसायट्यांमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात आहेत. या सोसायट्यांचा अध्यक्ष आणि कमिटीला उमेदवारांनी अमीष दाखवून मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले आहे. हा पैसा सोसायटीसाठी वापरला जाणार असल्याचे सोसायट्यांचे पदाधिकारी उमेदवाराला सांगताना दिसले. जो उमेदवार रोख रक्कम देईल त्याच उमेदवाराला आणि त्याच्या पॅनलला सोसायटीच्या आवारात घेऊन प्रचार करण्यास सोसायटीचे पदाधिकारी सहकार्य करायचे, मात्र ज्या उमेदवारांनी पैसे दिले नाहीत त्यांना सोसायटीच्या आवारात दाखल होण्यास विरोध केला जात होता. आज शहरात सोसायटीमध्ये 70 टक्के नागरिक राहत आहेत. त्यामुळे पोलीस पथकाला सोसायट्यांमध्ये रोख रकमेचे आणि साहित्याचे वाटप रोखण्यात अपयश आले.
पिंपरी चिंचवडच्या विकसित भागाप्रमाणे रोख रक्कम वाटप केली जात होती. प्रत्येक मतदारांच्या पाठीमागे भोसरीमध्ये चार ते पाच हजार, प्राधिकरणामध्ये तीन ते चार हजार, वाकड ,पिंपळे सौदागर, या भागात पाच ते आठ हजार रुपये, पिंपरी कॅम्प चार ते पाच हजार रुपये असे विविध भागात पैशाचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र वाटप करणाऱ्यावर,पैसे घेणार्यावर कारवाई झाली नाही हे सत्य आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनिमित्त 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे. रोकड, दारू ,गांजा ,अमली पदार्थासह, पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई 37 एफएसटी ,बत्तीस एसएसटी व 44 व्हीएसटी पथकामार्फत आदर्श आचारसहिततेची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत एक महिन्यात सहा दखलपात्र गुन्हे व 11 अदखलपात्र असे एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विदेशी दारू, गांजा, अमली पदार्थ, पिस्तूल गावठी कट्टे काढतुशे तसेच 19 वाशिंग मशीन आणि 18 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांच्या अधिपत्याखाली आचारसंहितेचे काम सुरू होते राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागांमार्फत 18 लाख 2500 रुपयांची रोख रक्कम, 65 लाख 79 हजार 178 रुपये किमतीची दारू, 49 लाख 11 हजार 531 रुपये किमतीचा गांजा, नऊ लाख तेहतीस हजार तीनशे रुपये किमतीचे एमडी, सात लाख 89 हजार 700 रुपये किमतीचे ओझी कुश अमली पदार्थ, 19 वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय 71 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.

