खंडणीसाठी नारळ विक्रेत्याला धमकी!

पिंपरी : नारळाच्या गोडाऊनमध्ये एका नारळ विक्रेत्याला खंडणीसाठी धमकावण्यात आले. त्याला मारहाण करून गोडाऊनची तोडफोड करण्यात आली. ही घटना १५ जून ते २७ जुलै या कालावधीत नढेनगर काळेवाडी येथे घडली. या प्रकरणात बसवराज मलाप्पा घोडके (वय ४३, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव नांजरकर (वय ३२, काळेवाडी) आणि इतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव याने फिर्यादीला फोन करून “तू नारळाचा व्यवसाय करतोस आणि तुझ्या गाड्या गोडाऊनसमोर लावतोस, त्यासाठी खंडणी म्हणून साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील” असे सांगितले. आरोपी वैभव याने ऑनलाइन माध्यमातून ९० हजार रुपये घेतले. त्याने फिर्यादीच्या गोडाऊनच्या गेटवर दगड मारून आणि ॲरो ॲक्वा प्लांटचे नळ तोडून नुकसान केले आहे. इतर आरोपींनी फिर्यादीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपी कारमधून गोडाऊनच्या आतमध्ये जबरदस्तीने आले आणि फिर्यादीला शिवीगाळ करून पैशांची मागणी केली व पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एका व्यक्तीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या दिशेने उगारून “आताच पैसे दे नाहीतर तुला बघून घेऊ” अशी धमकी दिली. काळेवाडी पोलिस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक!
पिंपरी :बेकायदेशीररित्या पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (२८ जुलै) दुपारी विशाल नगर, पिंपळे निळख येथे करण्यात आली.
कुणाल शिवाजी पुरी (वय २०, धायरी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार रवी पवार यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल पुरी याने त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगले. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

