शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त सूर्यवंशी

शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा दिला इशारा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स , महावितरण , टेलिफोन डीपी वर चिटकवलेल्या जाहिराती आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना संबंधितांवर कठोर कारवाई करून जाहिरातदारांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तरी नागरिक आणि जाहिरातदारांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा अनधिकृत फलक हटवून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या लावण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर्स, फ्लेक्स तसेच दूरध्वनी खांब, महावितरण डीपी आणि सार्वजनिक भिंतींवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षक यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून अनधिकृत फलक, बॅनर्स, फ्लेक्स त्वरित हटवावेत. तसेच अशा महावितरण डीपी ,भिंतीवरील जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजवाव्यात, अशा कंपन्यांवर शहर विद्रुपिकरणाबद्दल सक्त कारवाई करावी अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
याशिवाय, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स अथवा भिंतींवरील जाहिराती लावणे हा नियमबाह्य प्रकार असून संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार फलक तत्काळ हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

