चिंचवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची गाडी दिव्यांग व्यक्तीने पेटवली

चिंचवड : आपल्या विविध मागण्यांना महापालिका प्रतिसाद देत नसल्याने एक दृष्टीहीन आणि एक दिव्यांग व्यक्तीने चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी यांची गाडीची तोडफोड करीत गाडी पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. ४) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात घडली.
विनायक सोपान ओव्हाळ (रा. काळेवाडी) आणि नागेश गुलाबराव काळे (रा. चिखली) अशी काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ओव्हाळ हा पूर्णपणे दृष्टीहीन असून त्याने चिंचवड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काळे हा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४.२५ वाजता ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची ब्रिजा कंपनीची गाडी उभी होती. ही गाडी अपक्ष दृष्टीहीन उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ यांने पेट्रोल टाकून पेटवून दिली.
ओव्हाळ हे अंध असून त्यांच्या मते अपंग व्यक्तींना मिळणाऱ्या प्रशासनाच्या योजना सोयी सुविधा मिळत नाहीत. यामुळे आम्हाला ही पावले उचलावी लागतात. तर आरोपी नागेश गुलाबराव काळे यालाही पंतप्रधान आवास योजना अंतर्गत अद्याप घर मिळाले नाही. त्याचे नाव वेटिंगवर टाकल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र त्याच्या मागण्यांचा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही आहेत त्यांच्या नाराजीचे कारणे
थेरगाव हॉस्पिटल येथे कॅन्टीन चालविण्यास दिले नाही, रांका ज्वेलर्स एम्पायर इस्टेट येथे रसवंतीगृह चालवण्यास परवानगी दिली नाही, जिजामाता हॉस्पिटल चौक पिंपरी येथे फटाका स्टॉल परवानगी दिली नाही.
रमाई आवास योजनेअंतर्गत घर मिळालेले नाही. पत्नीस नोकरी मिळाली नाही.