सनदी अधिकारी प्रशिक्षणार्थींची प्रकल्पांना भेट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : केंद्रीय नागरी सेवेतील सनदी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांना काल भेट दिली. या अधिकाऱ्यांशी आयुक्त शेखर सिंह यांनी संवाद साधला. प्रशासनाच्या डिजिटलायझेशन प्रणालीची माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘महापालिकेचा ऑनलाइन कर भरणा, ऑनलाइन विवाह नोंदणी, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधा, समाजविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. डिजिटल साधनांमुळे केवळ कार्यक्षमतेत वाढ झाली नसून सर्वसमावेशकतेमध्येही सुधारणा झाली आहे. डिजिटलायझेशनच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास शाश्वत शहरी विकासासाठी असलेली महापालिकेची वचनबद्धता दर्शवितो. शहरात वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून महापालिकेने आराखडा तयार करण्यास सुरूवात केली आहे.’
औंध ते वाकड फाट्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा केलेले सुशोभिकरण, पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन, मोरवाडी येथील दिव्यांग भवन, निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर आणि आणि प्रकल्पांना प्रशिक्षणार्थींनी भेट दिली. या सर्व प्रकल्पांची माहिती प्रत्यक्षस्थळी आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे संबंधित विभागप्रमुखांनी दिली.