आकुर्डी खंडोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल!

पिंपरी : आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर आणि शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी यात्रा आहे यात्रेनिमित्त हजारो भाविक खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिर रात दर्शनासाठी येत असतात या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खंडोबा माळ चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आरडी आगामार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन तेथील जंक्शनवरून खंडोबा माळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकातून मोहन नगर चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक खंडोबा माळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर.डी आगा मार्गे गरवारे कॉलनी कंपाऊंड, टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील. चिंचवड दळवी नगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबा माळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने टिळक चौक शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छित स्थळी जातील. टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबा माळ चौकातून थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने सरळ चिंचवड स्टेशन दळवी नगर मार्गे इच्छित स्थळी जातील .

