वाकड -हिंजवडी गाव यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल!

दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत मार्ग बंद
पिंपरी : वाकड- हिंजवडी गावचे ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त दोन एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान होणाऱ्या पारंपरिक बगाड मिरवणुकीमुळे हिंजवडी ते वाकड मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे पोलिसांनी विविध रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

हिंजवडी येथून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निघणाऱ्या बगाड मिरवणुकीत सुमारे 40 ते 50 हजार भाविक सहभागी होणार असल्याने टाटा टी चौक, वाकड नाका, जॉमेट्रिक सर्कल, शिवाजी चौक, भुमकर चौक आदी प्रमुख मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे .वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार 2 एप्रिल रोजी दुपारी 12 ते रात्री दहा या कालावधीत अत्यावश्यक सेवा व मिरवणुकीतील वाहने वगळता सर्व सामान्य वाहनांना संबंधित मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.
हिंजवडी ते वाकड मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. आयटी कंपन्यातील कामगारांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये आणि हिंजवडी येथून निघालेले बगाड हे आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळेस वाकड मार्गावर येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सांगवी वाहतूक विभागांतर्गत दत्त मंदिर चौक ते पिंपळे गुरव कमान या मार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात आली आली असून वाहनधारकांनी बँक ऑफ महाराष्ट्र मार्गे शिवगणी चौकाचा पर्याय निवडावा. गाव यात्रेनिमित्त वाहतूक सुरळीत राहावी आणि मिरवणुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने ही अधिसूचना लागू केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

