पिंपरी चिंचवड शहर विकासाचा पाया ठरणार जनगणना!

प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी महापालिकेकडून विशेष प्रशिक्षण मोहीम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक तयारी सुरू झाली आहे. अचूक, पारदर्शक आणि प्रभावी जनगणना पार पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत क्षेत्रीय प्रशिक्षक (फिल्ड ट्रेनर्स) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रांवर सत्रे सुरू असून, या सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती, घरगुती सर्वेक्षण पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, डेटा संकलनातील अचूकता आणि नागरिकांशी प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जात आहे.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान राबवण्यात येणार असून, या टप्प्यात घरगुती सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करून पुढील नियोजनासाठी डेटा तयार करण्याचा उद्देश यामागे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेचे काम हाती घेतले जाणार आहे, ज्यामुळे शहराच्या लोकसंख्येचा तसेच सामाजिक व आर्थिक स्थितीचा व्यापक आढावा मिळणार आहे.
महापालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार म्हणाले, ‘जनगणना ही केवळ आकडेवारी नसून शहराच्या विकासाचा पाया आहे. अचूक माहितीच्या आधारेच भविष्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सेवांचे नियोजन करता येते. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.’
या संपूर्ण प्रक्रियेसाठी भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून माहिती संकलन सुलभ आणि जलद करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, माहितीची गोपनीयता आणि अचूकता राखण्यासाठी विशेष मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या पुढाकारामुळे पिंपरी चिंचवड शहर जनगणना प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज होत असून, नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घर भेटीसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना सर्वतोपरी सहकार्य करून, अचूक व योग्य माहिती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

